Sanatan Prabhat
मुंबई सत्र न्यायालयात प्रलंबित खटल्यांचा निकाल लागण्यासाठी ३० वर्षे लागतील !
मुंबईमध्ये मागील ५ वर्षांत गंभीर खटल्यांच्या २ सहस्र ५५० गुन्ह्यांचे निकाल किंवा माघार घेण्याची सरासरी पहाता वर्ष २०२० पर्यंतच्या खटल्यांचा निकाल लागायला पुढील ३० वर्षे लागतील. यापुढेही आणखी खटले सुनावणीसाठी आले, तर हा कालावधी आणखी वाढेल, अशी माहिती ‘प्रजा फाऊंडेशन’च्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी ‘ऑनलाईन’ घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली. वर्ष २०२० पर्यंत मुंबई सत्र न्यायालयात गंभीर गुन्ह्यातील ८५ टक्के आरोपी निर्दाष मुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये वर्ष २०२० मध्ये झालेल्या एकूण बलात्काराच्या गुन्ह्यातील ५८ टक्के बलात्कार बालकांवर झाले असून ही संख्या ४४५ असल्याची धक्कादायक माहितीही ‘प्रजा फाऊंडेशन’कडून देण्यात आली. या वेळी ‘प्रजा फाऊंडेशन’चा ‘मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती २०२१’ या विषयावरील अहवाल प्रकाशित करण्यात आला.